प्रति, बाप!
मला शिक्षकी पेश्याचा लई तिटकारा होता. त्याला मुख्य कारण; माझा बाप!
५ ला उठणं , मग फिरायला जाणं , मग योग, मग ७ला नाश्ता, ८ वाजता कॉलेज, मग १ ला घरी परत, मग जेवण, मग दुपारची झोप, पेपर वाचन, मग पुस्तक वाचन, लिखाण, ५ ला चहा, ५३०ला दळण, भाज्या नाहीतर किराणा, ७ ला बातम्या, ८ ला जेवता जेवता एखादी आवडती मालिका, ९३०-१० वाजता झोप. मग हे repeat .
वर्षानुवर्ष!
मला वाटायचं आयुष्यात काहीतरी बेक्कार डेरिंग करायला पाहिजेलंय. साच्यात बेडकं जगतात. मग आता मी हे असं वर्ष सहामाहिन्यातून घरी येतो. कॉलनी मधे घुसताक्षणी सगळं धूसर होतं. फक्त आपलं घर दिसत राहतं . मग घरात येऊन असा सोफ्यावर बसतो आणि शांत चित्ताने घर न्यायहाळतो. कुठे काय ठेवलेलं बदललंय बघतो. धूप बत्तीचा वास बदललेला असतो. Showcase च्या काचेला अडकवलेली यंदाची नवीन लग्न पत्रिका, टेबल वर बाप सध्या वाचत असलेलं पुस्तक, बापाचा चष्मा, शेजारीच पडलेल्या कागदावर असलेल्या त्या पुस्तकाच्या running नोट्स या सगळ्याची दखल घेत ती रात्र सरते. अश्या अनेक रात्री सरतात. मग सुट्टी पुढे सरकते. घर परत घरासारखं वाटायला लागतं. सवयीचं. सुट्टी संपायला येते तशी परत घालमेल वाढते.
तसं पूर्वी साधारण वाटणारं पण आता दुर्मिळ वाटणारं बापाचं routine बघतो आणि वाटतं ही जी जिंदगीची कुत्तरवढ करुन घेतली ती याच सुट्टीच्या १५ दिवसांसाठी होती का? जे जिथे हरवलं ते तिथेच शोधायचं सोडून कुठं भारताला गरके मारत बसलोय आपण?
पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या एखाद्या आडनावाला म्हसंखाईतून वर उपसायचं असेल तर एक जिगरबाज जन्मावा लागतोय जो तिथून पुढची अख्खी पिढी तारतो. तो जिगरबाज माणूस माझा बाप. आणि त्याला घडवणारी त्याची आई. विहिरीवर किंवा सरकारी योजने अंतर्गत रस्त्याच्या कामाला दगडफोडायला जाणारी त्याची आई आठवड्याचा पगार घेताना कंत्राटदाराच्या कागदावर अंगठा न लावता सही करणारी एकमेव बाई होती. तिच्या हट्टापाई बाप शिकला. संगमनेरातल्या ज्ञानमाता शाळेत मिशनरी शाळेत शिक्षण, पुढे ssgm कॉलेज मधून पुढचं शिक्षण. पैश्या अडक्यामुळे घर सावरायचं म्हणून नौकरी धरली. एका हातात जॉइनिंग लेटर दुसऱ्या हातात त्या काळी दिलेल्या upsc ची prelims चा निकाल. "धावत्याच्या मागं पळू नको" माझा आजा त्या काळी बापाला म्हणाला असेल. मग पर्याय नसलेल्या बापाने नोकरी धरली ती धरलीच.
२२ वर्षाचा कवळ्या शरीरयष्टिचा प्राध्यापक. साताऱ्याच्या दहिवडी कॉलेज मधे रुजू होण्याचा पहिला दिवस. वर्गात जाणाऱ्या कोणत्या तरी पोराने बापाच्याच खांद्यावर हात ठेवून विचारलं कोणाचा तास आहे रे?
बापाने ओशाळून उत्तरच दिलं नसेल. मग बापाची त्याच वर्गात शिक्षक म्हणून एंट्री. काही मिनट awkward silence.
अशी सुरुवात आणि मग ३७ वर्ष नौकरी. पुढे PhD केली, असंख्य पेपर प्रकाशित केले, अनेक वृत्तपत्र column नी झोडपले, सभा गाजवल्या, भाषणं ठोकले. बापाच्या आयुष्यात दुसरं काहीच नाही. फक्त पुस्तकं आणि लिखाण. म्हणाल त्या विषयावर तासनतास बाप बोलेल. तारखांसहित मुद्देसुद विश्लेषण. घराला कित्येक वर्ष खिडक्या नसतील, मोठा टीव्ही नसेल पण जाल त्या खोलीत पुस्तक. बापाला पुस्तकातून जग कळाल पण दुनियादारी कदाचित कळाली नाही, पैश्याचा हिशोब कळाला नाही. कायम घरात पैश्याची चणचण. यामुळे मला या नोकरीची अजूनच घृणा. बाप घरात येईल त्याला मागेल त्याला पैसे देऊन टाकायचा. मागायचं कधीच नाही. कधी कधी शाळेची फी च भरायला पैसे नाही. वर्गात ४-२ डोके असतात त्या पैकी आपलं कायम नाव घेतलं जायचं सहामाईची फी भरायला लेट झालं की.
कधी कधी खर्चाची लईच तारांबळ झाली तर बाप तोंड बारीक करुन म्हणायचं भैय्या जातो कारे त्यांच्या घरी? सांग पप्पांनी तुम्हाला दिलेले पैसे पाहिजे आहेत. मी आपला हाफ चड्डी बापाचीच atlas सायकल घेऊन नळीच्या मधे पाय घालून पॅडल मरत देणेदाराच्या घरी जायचो. आजपर्यंत जेवढ्या देणेदारांच्या उंबऱ्यावर गेलो, एकाने पण वेळेला पैसे परत केल्याचं आठवत नाही. नंतर ही कोणी आणून दिल्याचं स्मरणात नाही. कारण; आई. बापाला या ना त्यात कारणावरून लक्षात आणून देण्याचं तिची ड्रील. आता हे लोक कोण होते यांना चेहरा नाही. धूसर ते ही.
मी पार पाचवीला जाईपर्यंत बाप कॉलेजला सायकल वर जायचा. कॉलेज चे शिपाई सुद्धा गाडीवर टांग मारून यायचे. एकदा कोणतातरी शिपाई का सहकारी-शिक्षक ओरडला तुला शोभतं का हे? घे लेका एखादी मोटरसायकल. लाजत काजत बापाने स्प्लेंडर घेतली. ती पण एकदा लई अडचण आली म्हणून ओढून न्यायला लागले तर कोणीतरी मदतीला धावून आले. बाप फक्त देत गेला. लोक असो नाहितर कुटुंब. बाप ओरबाडला गेला. या खपल्या आत्ता आत्ता पर्यंत होत्या. बापाला एकदा मी खूप महागडा बूट आणला. ब्राँडेड. एवढा महागाचा बूट पायात कसा घालायचा हा प्रश्न बापाला बरेच दिवस पडला.
आई मला म्हणायची तू BA कर , MA कर, NETSET पास हो, प्रोफेसर हो. मी तमाशे करायचो. मला वाटायचं माझी लायकी काढते की काय. जे आयुष्यात काहीच करत नाही ते असलं काहीतरी करतात मला घरातलं हे बघून वाटायचं .
पुढे जाऊन मी ते ते सगळं केलं जे शिक्षकाच्या पोराने केलं नाही पाहिजे. बाप ज्या कॉलेजात शिकवायचा तिथे मी लई धुमाकूळ घातला. हाणामाऱ्या, तोडफोड, ब्लॅकलिस्ट ला नाव, स्टेशन डायरीत नाव. दिवसभराचा शेड्यूल असतंय तसं हे हाणामाऱ्यांच्या शेड्यूल असायचं . बस दारू सिगारेट आणि मुलींची छेडछाड वगळता मी बापाचं लई नाव बदनाम केलं. सगळीकडे छिथु.
अश्यात बारावीचा निकाल गंडला. मी खोलीत स्वतःला कोंडला. आईने एवढा लोड घेतला की तिला जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा ती मला येऊन बदडून जायची. रडत बसायची. या उलट शिस्तप्रिय असेलला बाप एकदम शांत होता. बापाची कोलगेटच्या पेस्टला सुद्धा कसं ब्रशवर घेतात याची पण ड्रील सेट होती. पेस्टच्या कायम खालच्या भागातून दाब देऊन मग ब्रशवर पेस्ट घ्यायची, जेवताना तोंड वाजवायचं नाही, डावा हात जेवताना वापरायचा नाही, नखं वाढू द्यायचे नाही, टीव्ही चा आवाज ठराविक च असेल पाहिजे, सिनेमा चे गाणे शक्यतो वर्ज्य अश्या शिक्षकी ड्रिल्स घरात होत्या. त्यात पोरगं असलं यड x वं निघालं म्हंटल्यावर बापाच्या मनावर काय बेतली असेल बापालाच माहिती. बापाने माझं बारावीचं प्रकरण एकदम संयमाने हाताळलं . खरकट्या मार्कांवर माझा DY PATIL ला BDS ला नंबर लागत होता. बाप म्हणाला म्हणत असशील तर अजून कर्ज काढतो, तुला BDS ला टाकतो. पण तुझा कल तिकडे दिसत नाही. त्यापेक्षा तू BA कर स्पर्धा परीक्षेची तयारी कर. २४ तास देतो विचार करा. आपल्यावर आभाळ कोसळलं. आई हिणवत होती ते खरं ठरणार होतं . मी कॉलेज लाच जायचो नाही. गेलो तरी एखाद दुसरा तास करायचो . त्यात बापाचा तास असला की बाप असा एका दरवाजाने आत यायचा आणि मी दुसऱ्या दरवाजाने बाहेर जायचो. मी अन् माझा एक दोस्त नोकिया ३५०० मधे ssgm च्या ग्राउंड वर झाडाखाली हिमेश रेशमिया कुमार सानू चे बेक्कार दर्दी गाणे ऐकून दिवस काढले.
वर्गातले पोर विचारायचे काय रे ते रणधीर सर कोण आहे तुझे? आडनाव सारखा आहे तुमचं ? मी म्हणायचो लांबचा चुलता आहे. कहायला अजून उरलेली इज्जत घालवा असा वाटून.
पुढे FYBA english ची परीक्षा झाली आणि मी टॉपर होतो. कसकाय माहित नाही. माझ्यात ते कायम उपजत होतं. पुस्तांकनचेच संस्कार असलेला मी भाषा या गोष्टीत कायम पुढे होतो. हिंदी मराठी आणि इंग्रजी चे पाठ्यपुस्तक मी एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जाताना मे च्या सुट्टीत संपवून ठेवून द्यायचो . बापाला मी काय नीट करतो हे कदाचित माझ्याही आधी कळाल. असो. तर मी टॉपर कसा हे बऱ्याच जणांना झोंबलं. त्यावर प्रश्न उठवले गेले. बाप सरळमार्गी. बाप म्हणे परत देतो का परीक्षा? म्हंटला चा घोडा यांच्या शिक्षण व्यवस्थेच्या. असले इंग्रजी चे पेपर मी फाट्यावर मारतो. म्हंटल नाही देणार. बाप ही काही बोलला नाही. पण तिथून पुणे, मग आयुष्य थोडं स्थिरावलं . स्थैर्य देणारा एकच माणूस बाप. एवढा संयम बापात कुठून येत असेल? कदाचित ते बाप झाल्याशिवाय नाही कळणार. पण मी गुणवत्तेचाच विचार केला तर फार यश नाही मिळवू शकलो. वर्षामागून वर्ष स्पर्धा परीक्षेत नापास होत गेलो. वर्षभर लई आटपीटा करुन खुर्च्या झिझवल्या पण हातात काहीच येत नसत. बापाच्या पगार जमा होत असलेल्या बँकेचे खाते माझ्याकडे असायचे. बाप म्हणायचं तू कर. वाट्टेल तेवढा पैसा घे त्यातून. एक दिवस होणार सगळं नीट. माझ्यातला आंडीपणा ठेचला जाऊन मी अधिक शांत होत गेलो. कोषात गेलो. लोकांशी बोलेनासा झालो. दिवाळ्या सुट्ट्या हुकवू लागलो . अश्यात एखादा निकाल यायचा. मी नापास असायचो. पहिला फोन बापाला करायचो . मला आपण फक्त एकाच माणसाला उत्तरदायी आहोत अस वाटायचं . निकाल ऐकून एक दीर्घ शांतता ऐकू यायची. कळायचं बाप खचला. बाप खोटं हसायचा , धीर द्यायचा. एवढं नाही मनाला लावून घ्यायचं रे. तू करत रहा, होणार आहे आपला नीट. लागू दे पैसा. तू इकडची काळजी करू नको. लोकांचा नाही विचार करायचा. बापाचे वर्षानुवर्ष ठरलेलं वाक्य. बापाने काय मिळवलं त्या दिवशी सत्कार समारंभात पोर पोरी ढसाढसा रडतांना पहिले आणि जाणवलं आपण अजून काही नाही मिळवलं. क्षमतेला पाहिजे तितका न्याय नाही दिला.
बापाशी आधी फार बोलणं व्हायचं नाही. पण आता मी बापाला काळजीपूर्वक ऐकतो. अचानक मला बापाने बोललेलं रिलेट व्हायला लागलंय.
जिथं बाप शिकला, आई शिकली, मी शिकलो, मग बहीण शिकली, मग जवळपास सगळेच भावंड शिकले, त्याच कॉलेजात बाप एक दिवस अप-प्राचार्य होईल अस बापलाही कधी वाटलं नसेल. ते म्हणतात ना एखाद्या माणसाचं आयुष्य हाच एक संदेश असतो. तसल काहीतरी बापाच्या बाबतीत आहे. त्या दिवशी सत्कार समारंभात मला त्यांच्या स्टाफ मधले लोक म्हणाले काहीतरी बोला. म्हंटल नाही होणार माझ्याकडून. बाप रिटायर होणार मला हे मेंदूत नोंदच होत नंव्हता . बापाला दिवसा फ़ोन केला की हॅलो च्या आधी कॉलेज मधे आहात का हे विचारायचो. आता गेल्या १५ दिवसात नाही विचारत. चायला हे रिटायर होण पण विचित्र भानगड आहे. म्हणजे तुम्ही आयुष्याचे ३७ वर्ष एकच काम करता, आणि एक दिवस तुम्हाला संस्था म्हणते आता तुम्ही रिटायर. आता तुम्ही उद्यापासून येऊ नका कामाला. एक काम करा अर्धा पगार घ्या घरी बसून. एका एकी कसकाय उमजेल मनाला. हे माणसाला एकदम रिटायर करण्याच्या नियमात बदल करणे गरजेचं आहे. तुम्ही त्या माणसाला दिवसाआड, मग आठवड्यातून दोनदा, मग एकदा, मग महिन्यातून एकदा असा करत करत मग त्याला एक दिवस सेवानिवृत्त करा. माणसाच्या उभ्या आयुष्याचा झगडा identity साठी. एक दिवस कोणाकडून अशी त्याची ओळख काढून घेणं क्रूर आहे.
बरं या सगळयाचा undercurrent हे रिटायर होण्याचं दुःखं नाहीये. दुःख हे आहे बाप आता ६० वर्षांचा झालाय. दर सुट्टिगणिक बापाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या मागच्या वेळेसपेक्षा जास्त दिसू लागलेल्या असतात. डोळ्यांच्या बुबुळवरचा पांढरा थर तयार होत चाललेला असतो. बाप आता अचानक पहिल्यासारखी दगदग सहन होत नाही तक्रारी करू लागलेला असतो. वाईट याचं वाटतं. बाकी फाफटपसारा आहेच की.
सेकंड इनिंग वेगरे चा सेलेब्रेशन कसकाय करायचं मला त्या दिवशी प्रश्न पडला. असो. अख्खी दुनिया एक दिवस रिटायर झालीये. त्यांना मार्ग सापडलेत. आपल्याला पण सापडतीलच की.
Comments
Post a Comment