अक्षरातलं स्वातंत्र्य!

     


उन्हाळा सुरु होणार होता आणि मी इयत्ता आठवीचा शेवटचा पेपर देऊन घरी आलो. अभ्यासाच्या खोलीत वडील वाचत असलेला डॉ श्रीराम लागूंचा "लमाण" पुस्तक टेबलावर दिसलं. त्या ठराविक काही वर्षात डॉ लागूंचा "पिंजरा" म्हणजे दूरदर्शन च्या पिंजर्यात अडकलेला पोपटच जणू! (मी इथे घरात केबल नसलेल्यांच्या आयुष्याची 'कशी नशिबाने थट्टा मांडली' होती हे नमूद करू इच्छितो). तर. 'तो' तमाशा. 'त्या'  बाई. आणि 'ती' बाटली. एवढीच मास्तर आणि आपली ओळख! उत्सुकता म्हणून पुस्तक चाळू लागलो. पुस्तकाचा साहित्यिक दर्जा समजण्याचा प्रश्नच नसल्याने आपल्या अकलेप्रमाणे आधी छायाचित्र, मग कंटाळलल्यावर एक पान उलटलं. दृष्टी पडली त्या पहिल्याच वाक्यात निळू फुले कोणाला तरी 'सेंद्रिय' शिवी हासडतायेत असा काहीसा तो प्रसंग होता. आता निळू फुले आणि बाकी 'सिने-अनैतिकता' जाणून होतो मात्र काहीतरी इतकं प्रक्षोभक थेट वाचण्याचं हे पाहिलंच निम्मित्त. आजवर मुंगळ्याची आत्मकथा वाचणारे आम्ही दयनीय कॉन्व्हेंटवाले हे वाचून थबकलो नसतो तर नवल. हे मास्तर ने लिहलय? मुख्य म्हणजे असं पुस्तकात लिहता येतं? एवढं स्वातंत्र्य? असे प्रश्नांचे चिन्हं डोक्यात चमकू लागले. आणि तेव्हा पासून वाचन या गोष्टीची एकच व्याख्या मनात घर करून राहिली. 'वाचन म्हणजे स्वातंत्र्य!'  हवं ते. पचेल तसं! बंधनाच चर्हाट नाही. मर्यादेचा कोयता नाही!  
पुढे बुढिया कि कुटीया पासून टोप्या चोरणाऱ्या माकडांच्या गोष्टी इयत्ते प्रमाणे डोळ्यांखालून सरकत होत्या. आमच्या 'कॉन्व्हेंट' बुद्धीला झेपेल अश्या 'लोवर लेव्हल' मराठी पाठ्यपुस्तकं शाळा सुरु होण्या आधी संपवलेली मला आठवतात ज्यात बाकी प्यूपल सर्रास नापास व्हायचे. असंच दहावीत MP अनिलकुमार यांच्या 'एयर बोर्न टू चेयर बोर्न'  पुस्तकातला एक धडा वाचनात आला. वायू सेनेतल्या या अपघातग्रस्त, अर्धांगवायू जडित शरीरातल्या कैद मनातली घुसमट त्या पानातून थेट माझ्यापर्यंत पोहोचली आणि स्वातंत्र्याची नवनव्या व्याख्या उमगू लागल्या. आपल्या व्यक्तीमत्वाचा कल पुढे 'फोर्स' कडे का गेला याचा आत्ता-आत्ता उमगलेल्या अनेक कारणांपैकी हे एक कारण.

आता या या माणसाचं आत्मचरित्र वाचलं आणि आयुष्य बदललं वेगेरे भानगड आपल्यासोबत झाली नाही. पण पुढे कधीतरी नरेंद्र जाधवांचं 'आय एम एन आऊट कास्ट',  विजय तेंडूलकरांच्या "एक" कादंबरी अश्या वेगवेगळ्या पुस्तकांपासून  वाचनाला खरी सुरुवात झाली. पुस्तकातले पात्र आणि त्याचं आपल्या आयुष्याशी असलेला साम्य विस्मयकारक वाटत गेलं. घडून गेलेले प्रसंग आणि पुढे घडणार होतं असं बरंच काही आपण पूर्वीच जगलोय असे 'देजावू' होत राहिले.
सवय जडली. मिळेल ते वाचायला सुरुवात केली. एकीकडे 'आत्महत्येत शिकवण आहे' असं वाटायला लागल्यावर जॉन डन 'डेथ बी नॉट प्राऊड' मधून मृत्यूलाच ठार करतो म्हणाले. दुसरीकडे अस्तित्व आकार घेत असताना अस्तित्वच नकोसं झाल्यावर विंदा 'माझ्या मना बन दगड' म्हणाले. नकळत कुठे तरी या मानवी आवाजांची नोंद मनावर होत गेली.

रशियन असो किंवा एलिझाबेथन इंग्लिश साहित्य असो. भोवतालच्या सामाजिक वातावरणाने, धर्माने, संस्र्कुतीने, इतिहासाने आणि अंतराने दुभंगलेले आपण सगळे एका अनामिक गोष्टीने कसे परस्परांशी जोडलेले आहोत हे जाणवलं.
मग चाॅसर पासून शेकस्पिअर. जेम्स जाॅईस पासून हिलरी मॅनटल. राजा राव ते आर के नारायण पासून बाबुराव बागुल पर्यंत आपल्याला आवडेल ते आपल्याला समजेल ते वाचलं. वाचन वाढतं तसं कल्पना शक्तीची कक्षा रुंदावते. 'व्हाईट' इंग्लिश पात्र वाचत असताना सत्ता हरपलेला, भिकेला लागलेला, वेड लागलेला, केस आणि दाढीचे खुंट वाढलेला हेकट किंग लिअर माझ्या कल्पनेत मला धोतरातच दिसू लागला. जॉर्ज इलियटच्या 'मिल आॅन द फ्लॉस' मधले भावंड महाराष्ट्रातील खडकाळ खेड्यातले भावंड वाटू लागले. काय करणार स्वातंत्र्य कबूल करून घेतलंय पुस्तकांकडून!

एका जन्मात येणाऱ्या अनुभवांवर मर्यादा आहे. पण १ लेखक वाचताना त्याच्या व्याखेतला एक नवीन जन्म अनुभवता येतो. एकदाच मरण्याआधी १००० जन्म कोणाला नकोत? गलीवर(किंवा गल्लीभर म्हणा) ट्रावेल पासून गांधींच्या "थर्ड क्लास इन इंडियन रेल्वे" मधून प्रवास याच मुळे शक्य झाला! ( ते खरंच गांधींच्याच पुस्तकाचं नाव आहे! आईशपथ!).

पुस्तकात लिहलंय ते आपल्याशी जोडता येणं अवघड नसतं. पुस्तकात तुमची प्रतिकृती आहे की तुम्हीच पुस्तकाची प्रतिकृती आहात असे प्रश्न पडायला लागले कि लेखक आणि वाचक दोन्ही यशस्वी झाले असं समजावं. पुस्तकं रोगनिवारक किंवा औदासिन्य घालवण्यात मदत करतात वेगेरे वैज्ञानिक तपशीलात जायला नको. पण पुस्तकातलं एक माणूस एका ठराविक वेळी एका वरकरणी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टींवर अनावश्यक विचार का करतो? त्याचं आयुष्य इतकं संथपणे का जात असतं? तो तसेच शर्ट का घालतो? नेहमी हातातल्या चाकुशी का खेळतो? मुख्य म्हणजे ते आपण का वाचतो? आणि त्या ही पेक्षा मुलभूत प्रश्न म्हणजे ते लेखकाने का लिहलंय? असे बुद्धी डिवचणारे प्रश्न पडतात. आयुष्यातला प्रत्येक दिवस काही मैफिल असू शकत नाही. तो नसतो. तो नसावा. जरी वेगात सगळं पुढे सरकत असलं  तरी आपल्या आयुष्यातल्या बहुतांश काळ हा त्या पुस्तकातल्या त्या माणसाच्या आयुष्या प्रमाणेनेच जात असतो. त्यातले बारकावे आपल्याला समजत नसतात. पण समजायला लागले की हेच बारकावे चित्तवेधक वाटायला लागतात. मग त्याच्या मनातले  विचार त्याची वैचारिकता दर्शवतात, शर्ट त्याचं समाजिक स्थान आणि चाकू त्याची ओळख. बारकावेच कसे प्रचंड मोठे असतात ही प्रगल्भता येत जाते. मग एखादा दिवस, एखादा तास, एखादा क्षण, एखादा गाणं, एखादी जाणीव, एखादी नेणीव, एखादा गंध, एखादी झुळूक, एखादा पाऊस, एखादी सावली, एखादी संध्याकाळ अनुभवत असताना आपल्याला नेमकं काय होतंय असे प्रश्न पडतात. उत्तरं आपण ओळखत नसलेल्या, काळोखात लुप्त झालेल्या माणसांनी देऊन ठेवलेली असतात. जानी, ते शोधण्याचा उशीर असतो!

आता प्रश्न आवडी-निवडीचा! वाचन आवडू लागल्यावर गर्दी जे वाचते ते वाचण्यात बरेच जण दबले जातात. असुरक्षितता मनात झिरपायला लागून मी ही असाच एक जीवघेणा प्रयत्न केला. मला 'भगत-रीओसीस' आहे असं निदान झाल्यावर, डॉक्टर हात मागे घेत म्हणाले, मैने इंजेक्शन दे दिया है, पण यांना चेतन भगत वाचणार्यापासून लांब ठेवा. पुढे मी त्यातून बचावलो आणि लोक म्हणतील ते वाचण्याचा 'माणूसपणा' केला नाही. (जॉर्ज ओर्वेलचं 'अनिमल फार्म' वाचल्यापासून मी गाढव आणि इतर प्राण्यांचा अपमान करत नाही!) काय वाचावं याचा कोणताही शिष्टाचार नाही. मात्र आपल्याला नेमकं काय आवडता हे एकदा समजलं कि तुमच्या शैलीतलं साहित्य आपोआपच तुमच्यापर्यंत येत. कसं ते ठाऊक नाही!

एका बाजूला सिनेमातल्या स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना एखादा पेरूमल मुरुगन किंवा एखादा सलमान रश्दी वगळला तर तशी परिस्थिती बरी आहे. कलाक्षेत्र कोणतंही असो. व्यक्त होता येणं आणि व्यक्त झालेलं सर्वांपर्यंत पोहोचवता येणं महत्वाचा आहे. तो सर्वांचा मुलभूत अधिकार आहे. कारण प्रश्न मजकुराचा नाही. प्रश्न स्वातंत्र्याचा आहे! मात्र भारतापुरतं बोलायचं झाल्यास सचिन कुंडलकर यांचं 'कोबाल्ट ब्लू' तूर्त तरी ते फक्त लिहू शकतात, त्याचं चित्रपटात रुपांतर व्हायला आणखी किती अवकाश आहे हे अनिश्चित आहे. तोवर आपण अक्षरात स्वातंत्र्य शोधण्यास काही हरकत नाही!

Comments

Popular Posts