संप्या
बारा पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. मी अकरावी-बारावी सायन्स शाखेला होतो. गणितात मोक्कार कच्चा होतो. त्यात दोन वर्ष निव्वळ कुत्रेहाणत फिरलो. म्हणून मग बारावीचा निकाल घुसला! लैच! Armed Forces Medical College(AFMC) ची परीक्षा देऊन सैन्यातडॉक्टर-बिक्टर व्हायचं होतं. Bio ने तारलं पण सालं physics chemistry च्या गणितानं असा फटका दिला की एक दिवस उठलोअन ते स्वप्नं मी असं हाताने आवळून मारलं. त्रास झाला. स्वप्नं भंग वैगेरे! बरं ते झालं म्हणून काहीच लायकीचा न उरलेलो मी आर्टस्लाऍडमिशन घेतलं. त्यात आपलं बॅकग्राउंड थोडं कांडवादी असल्याने घरचे म्हंटले तू घरातच बरा. पुण्यात पहिल्या वर्षी ऍडमिशन काहीमिळालं नाही म्हणून कोपरगावातच B.A. पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं. सोबतचे पोट्टे इंजिनीरिंग मेडिकल करायला शहराकडे गेले. मी मन मारून तालुक्यातच राहिलो. त्या वयात यावं तसं डिप्रेशन मध्ये गेलो. Identity crisis वैगेरे प्रकार झाला. पण मन रमावं म्हणूनपर्याय शोधू लागलो. मी सातवीत असतांना black belt झालो होतो. अधून मधून प्रशिक्षण देण्याचा अनुभव होताच. म्हणून मग कराटे क्लासेस घ्यायला सुरुवात केली.
माझ्याकडे कराटे क्लासेस साठी संपत यायचा.
संपतची उंची मध्यम. वय 23-24. गोल चेहरा. सावळा वर्ण. देवी मुळे चेहर्यावर खड्यां सारखे व्रण. चेहरा उग्र दिसत असला तर स्वभाव, बोलणं मृदू. मितभाषी. विचारलं तेवढंच उत्तर देणारा. जिभेला मीटर लावलाय कि काय असं वाटावं एवढं मोजकं बोलायचा. न्हाव्याच्यादुकानात फोटोत दिसतात तसे दाट केस. अधून मधून ते त्याचा कपाळावरून सरकत डोळ्यांवर यायचे. मग तो काहीश्या बायकीअंदाजात मानेला झटका देऊन ते मागे उडवायचा.
संप्या गवंडी काम करायचा. घर कोपरगाव पासून काही किलोमीटर वर असलेल्या नाजिकच्य खेड्यात. आई त्याच्या लहानपणीचमेलेली. हयात फक्त बाप. बाप जक म्हातारा. आणि त्यात आंधळा. मुंबईत मिल कामगार होता. उताराला लागला तसा कुठल्याश्याआजाराने त्याची दृष्टी कमी होत गेली. बापाला हाच सांभाळायचा.
संप्या दिवसभर गवंडी काम करून त्याच्या रंगीत सायकल वर बरोबर 5 वाजता कोपरगावच्या इनडोअर गेम हॉल मधे यायचा. सिमेंट नेमाखलेले कपडे झटकायचा. आणि हॉल च्या दरवाजाचं दर्शन घेत आत यायचा. नित्यनियमाने.
त्या वेळी आमच्याकडे जो कोणी ब्लॅक बेल्ट व्हायचा त्याला संस्थेची मान्यता मिळायची आणि तो खेळाचा प्रसार व्हावा म्हणूनकुठल्याही जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा जागा मिळेल तिथे कराटेचे वर्ग सुरू करू शकायचा. त्यातून थोडी फार फी मिळायची. खिशाला आधार!
"सर घर बांधायचय. पैसा जुळवतोय." राहत्या झोपडीपासून हाकेच्या अंतरावर त्याने पाया रोवुन घराचा बांधकाम सुरु केलं होता. पैसासंपला की काम थांबायचं. पैसा आला की एकटा काम सुरु करायचा. मिस्त्री हाच. गवंडी हाच. घर, पैसा, कुटुंबाची परिस्थिती यासगळ्यावर कधी-कधी तासन तास बोललो असू आम्ही.
दरम्यानच्या काळात ब्लॅकबेल्टच्या परीक्षेसाठी त्याने पैश्यांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली होती. 6-7 हजार त्या वेळी फीअसायची जी तुलनेने मोठी रक्कम होती. थोडी रक्कम जमली कि माझ्याकडे आणून द्यायचा खर्च व्हायला नको म्हणून. एकदा अडचणआली म्हणून साठलेली सगळी रक्कम तो घेऊन गेला. संपर्क तुटला. पण
त्या नंतर तो कधीतरी ब्लॅक बेल्ट झाला आणि कुठेतरी क्लासेस घ्यायला लागला.
अलीकडे जरा गप्प गप्प राहू लागल्याचं ऐकण्यात आला होतं. मधल्या काळात भेटला तेव्हा त्याचे दोन्ही गुडघे फुटलेले दिसले. त्याबद्दल विचारल्यावर जरा ओशाळुन म्हणाला, "वणी च्या दर्शनालाला गेलथो. गुडघ्याने गड चढलो."
श्रद्धेपुढे विद्वान कोलले जातात. आपण गप्पं राहिलो.
एकदा मी असाच दुपारी जेवत बसलेलो असतांना संप्याच्याच गावातल्या माझ्या जवळच्या मित्राचा कॉल आला. शक्य तितक्या थंडस्वरात तो बोलला
"रित्या, संप्या ने फाशी घेतली."
धक्का बसतो तेव्हा त्या बातमीची खोलवर नोंद व्हायला जेवढा अवकाश लागतो तेवढा वेळ मी शुन्यात बघत राहिलो. कधी, कसं, कायविचारल्याचं मला आठवत नाही. ताटावरून उठलो.
फासावरून उतरेपर्यंत हा मरण पावला होता. पण लोकांनी त्याला तसंच रिक्षात घालुन सरकारी दवाखान्यात आणलं. अर्थात ते निरर्थकआहे माहित असून. मी धडपडत त्या सरकारी दवाखान्याच्या परिसरात पोहोचलो. नातेवाईक म्हणावं असं फार कोणी नसल्यानं ज्यांनीत्याला तिथे आणलं त्यांच्याच कडून काय ती माहिती मिळवली.
डेडबॉडी कुठे आहे विचारला असता कळलं शवविच्छेदनाच्या खोलित ठेवली आहे. अंगात होतं तेवढं त्राण एकवटून मी त्या दिशेने चालतगेलो. पोस्ट मॉर्टेम ची खोली कंपाउंड नाजिकच्या उकिरड्या जवळ होती. अवती भोवती डुकरं गाढवं कुत्रे कचऱ्याच्या डोंगरात फिरत होते. खोलीला खिडकी म्हणावी अशी नाहीच. फक्त लोखंडाची जाळी आणि एक दरवाजा ज्याला बाहेरून कुलुप. आणि त्या खोलीभोवतीस्मशान शांतता. एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी फक्त त्या खोलिभोवतीचा शांतता कशी याचं अप्रूप वाटत होतं. मी संथपणे जाऊन त्याखिडकीपाशी उभा राहिलो. आत संप्या एका स्टीलच्या स्ट्रेचरवर पडलेला होता. कुठलीशी फिकट निळ्या रंगाची फाटकी जीन्स पॅन्ट, भोक पडलेला पण शुभ्र बनियान. माने जवळ ज्या दोरीने फास घेतला त्याची खोलवर खून. मान त्या बाजुला टाकलेले. गळ्यात खोटीसोन्याची साखळी. वरती full स्पीड ने फिरणारा पंखा त्याचे केस भुरुभुरु उडवत होता. इतका वेगाने फिरणारा पंखा मी आजवर त्याचखोलीत पाहिलाय. आजही कुठेही पाचच्या स्पीड वर फिरणारा पंखा पहिला कि मला ती खोली आठवते. पोस्ट मॉर्टेमच्या खोलीत एकघाणेरडा वास. मृत माणसाच्या शरीराच्या वासाची व्याख्या करता येणार नाही.
त्यात आपण इतका जवळून ओळखत असलेला, असा अवती भवती फिरणारा जिवंत माणूस समोर मरुन पडलेला पाहिला की प्रथमदर्शनी विश्वासच नाही होत. संप्या आत्ता गडबडून उठुन केस उडवून, "अरे काय सर" म्हणेल असं मला बरच वेळ वाटत राहिलं. मीएकदम निर्विचार अवस्थेत मागे वळलो. तोवर दुपार झाली होती. वर्दळ तशी कमी झाली होती.
संप्या एका पोरीच्या प्रेमात आहे असं ऐकून होतो. हा त्याच पोरीसाठी नवस म्हणून वणी देवीचा गड गुडघ्यावर चढून गेला असं कळालं. गेल्या महिन्यात तिचं लग्न ठरलं. हा होता एका जातीचा आणि ती आणखी कोणत्या जातीची. त्यात याची परिस्थीती अशी असल्यानेत्यांनी याला पोरगी देणं शक्यच नव्हता. आजच्या दिवाशी तिचं लग्न होतं.
गाव छोटं असलं आणि असं काही लग्न कार्य असलं की शक्यतो घरात दुपारी चूल पेटत नाही. गाव लग्नाच्या पंगतीतच जेवतं.
तिचं लग्नं लागत असताना हा मंडपातच होता.
तिला पाहुन आसवं गाळत होता. पोरगी याला बघून धास्तावली. वरमाला घालायला पुढचं सरकेना. ते सगळं सहन न होऊन हा मंडपातूनउठून घराकडे चालत निघाला. मंगल अष्टक कानावर पडतच होतं. संप्या येऊन चाहुडित बसला. आंधळा बाप बाजेवर बसुन होता. शेजारी मावशी बसलेली होती. संप्या जाऊन शांतपणे ओट्याच्या कोपर्यावर बसला. मावशी अनावधानाने म्हणाली, "भावय आता तूतरी कव्हर राहतो असाच. घरात आंधळा बाप है, घ्यावा लग्न करून." अर्थात मावशीला या बद्दल काही माहित नसणार.
डोक्यातलं वादळ झेलत संप्या काही न बोलता तडक उठला ते घरत शिरला, कवाड बंद करून त्याने फाशीच घेतली. किती काळउलटला कोणाला माहित नाही पण संप्या तोवर मरून गेला होता. एव्हाना नवरी नवरदेव तिकडे पंच-पक्वान्न खायला बसले ही असतीलएवढा वेळ गेला असेल. तो बराच वेळ दरवाजा उघडत नाही म्हणून कोणीतरी छतावर चढून कौल बाजूला सारून पहिला. शरीराचं तोवरप्रेत झालं होतं.
तरी त्यांनी त्याला इथे सरकारी दवाखान्यात आणलं.
आता संध्याकाळचे चार वाजायला आले होते. ज्यांनी त्याला इथे आणलं त्यापैकी कोणी नातेवाईक आहेत का अशी मी विचारणा केली. नातेवाईक नाहीतच असं समजलं. त्याचा आंधळा बाप मात्र एका झाडाखाली सिमेंटच्या ओट्यावर दबक्या आवाजात रडताना बसलेलाकोणीतरी मला दाखवला.
टक्कलावर विखुरलेले पांढरे केस, मळकं पांढरं धोतर, तितकाच मळका नीळ लावलेला पांढरा सदरा. त्याच्या ओठा तोंडावर माश्याघोंगावत होत्या. काहीतरी पुटपुटत म्हातारा काळीज तोडून रडत होता. पहिल्यांदा जाणवलं, अंध डोळ्यात अश्रू जास्त भेसूर दिसतात.
मी नुसताच जाऊन म्हाताऱ्याच्या शेजारी जाऊन बसलो. मी कोण कुठला, संप्याला कसा ओळखतो हे सांगण्यात काही अर्थ वाटलानाही. त्याला न माहित होऊ देता मी त्याच्या बापाच्या फक्त सोबतीला बसून राहिलो. सांत्वन नाही देता आलं. तो काय पुटपुटत होताशेवटपर्यंत कळालं नाही. हवेत नुसतेच त्याचे हुंदके तरंगत राहिले.
पोस्ट मॉर्टेम साठी प्रेताची चिरफाड करतात तो कार्मिक सापडत नव्हता. बरं आला जरी तरी त्याला आधी दारू पाजावी लागत. मग गडीतयार व्हायचा. एकदा तर सात आठ मुडदे पोस्ट मॉर्टेम साठी आले होते. याने सोबतीला अजून एकाला घेतला. मध्यरात्रीची वेळ, दोघंदारू पिऊन wrong झाले. मंग त्यांचे भांडणं झाले. त्या नादात त्यांनी अर्धा फाडलेल प्रेत उचलून नेऊन थेट कंपाउंडच्या बाहेरच फेकूनदिलं. कंपाउंडलाच लागून असलेल्या सार्वजनिक शौचालयात तांबडं फुटल्यावर प्रातः विधीसाठी आलेल्यांची ते पाहून हातभर फाटली. डॉक्टर लोकांची बोंबाबोंब झाली मग सरकारी कर्मचारी प्रेत परत घेऊन आले.
बरं त्याचे तत्व त्याहून खतरनाक. हा एका वेळी एक पोस्ट मॉर्टेम करत नाही. चार दोन असले तरच यायचा. हे माणसं फाडायचे भोगएकाच वेळी संपवावे वाटत असतील त्याला कदाचित!
विचार करायला विचित्र वाटलं तरी तिथे असलेले सगळे जण अजून दोन तीन प्रेतांची वाट बघायला लागले. सुदैव म्हणायचं कि दुर्दैवपण आणखी एक accident case आली आणि रात्री 8-830 च्या आसपास पोस्ट मॉर्टेम झाला.
मोजकी 20-25 लोकं होती अंतिमसंस्काराला. अति सामान्य पोराचं त्याहून सामान्य, शुल्लक,नाहक मरण. सहानुभूती वैगेरे कोणालाफारशी वाटत नव्हती त्या 20-25 लोकांच्या गर्दीत. त्यांच्या लेखी पोऱ्या लफड्यात होता म्हणजे फालतू होता. याच्या मावशीच्याचएखाद दोन किंचाळ्या हवेत भिरभिरल्या. अग्निडाग दिला गेला. आणि दिवस मावळला.
संप्याच्या गावात माझ्या मित्राला भेटायला जाण्याचं निमित्त होतंच असतं.
त्या नंतर बऱ्याच वर्षांनी सुद्धा जेव्हा-जेव्हा संप्याच्या गावाच्या वेशीत प्रवेश करतो तेव्हा तेव्हा संप्याचं ते अर्धवट बांधकाम केलेलं, नुसत्याच भिंती असलेलं छत नसलेलं घर दिसत राहतं. पुढे त्याच्या आंधळ्या बापाचा काय झालं माहित नाही पण एकदा तिथून जातअसतांना मित्राला उत्सुकता म्हणून विचारलं, "त्या संप्याच्या पोरीचं काय झालं रे पुढं? तिला कळाल्यावर काय झालं असेल तिचं?"
मित्र म्हणाला, "काही नई रे. छिनाल निघाली. दोन तीन पोरं झाले तिला. माहेरी आली कि त्या पिन्या बरोबर झोपती. हा चुत्या मेलाफुकट."
अजूनही ते पडकं, छत नसलेलं घर दिसत राहतं. अन सालं संप्याच मरण स्वस्तं होत राहतं!
- रितेश रणधीर
Comments
Post a Comment